पाटणमधील दानशूर पिता-पुत्रांकडून कठीणप्रसंगी माणुसकीचे दर्शन...❗


पाटण, दि. 31 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण पाटण तालुका लॉक डाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय आला आहे. बंदमुळे अनेक कुटुंबांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
 
अशावेळी शासकीय मदतीची वाट न पाहता आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त हेतूने कठीण प्रसंगी समाजाप्रती आपुलकीची भावना दाखवत सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे पाटणमधील प्रल्हाद माने व चिरंजीव स्वप्निल माने या पिता-पुत्रांनी शहरातील 300 गरीब कुटुंबातील लोकांना तांदूळ, गहू, ज्वारी, साखर, चहा पावडर आदी किमान 10 दिवस पुरेल असे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले. 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी करून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याला पाटण शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देखील दिला आहे. शहरातील सर्व रस्ते, चौक, गल्ल्या बंद करण्यात आल्या आहेत. भाजीपाला, किराणा दुकाने उघडी असली तरी ज्यांची ऐपत आहे ते दररोज जीवनाश्यक वस्तू खरेदी करू शकतात. मात्र ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे काय? हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.


सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने जे कटुंब मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दररोज कामावर गेल्याशिवाय त्यांचे जीवन चरित्र चालत नाही. अशावेळी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे आहे. पाटण शहरात नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असलेले आणि नेहमी संकटाला धावून येणारे पाटण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रल्हाद माने आणि त्यांचे चिरंजीव स्वप्निल माने हे दोघे पिता-पुत्र गोरगरीबांच्या मदतीला धावून आले आहेत.
या पिता-पुत्रांनी मिळून पाटण शहरातील इंदिरानगर, सिद्धार्थनगर कातकरी वस्ती ,तहसीलदार परिसर आदी ठिकाणी जाऊन जवळपास 300 गरीब कुटुंबातील लोकांना तांदूळ, गहू, ज्वारी, साखर, चहा पावडर आदी किमान 10 दिवस पुरेल असे जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे विविधस्तरातून स्वागत होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत सत्यजितसिंह पाटणकर, दिनेश माने, विकास उलपे, माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत अवघडे, पत्रकार विक्रांत कांबळे, नितीन पिसाळ आदी उपस्थित होते.