लोकनेत्यांचे नातू अर्थमंत्री शंभूराज देसाई विधानपरिषदेत मांडणार राज्याचा अर्थसंकल्प. ४५ वर्षानंतर सातारा जिल्हयाला विधीमंडळात अर्थसंकल्प मांडण्याचा बहूमान.


कराड दि.०३:- इतिहासाची साक्ष आहे कर्तबगारीचा वसा तिसऱ्या पिढीत येतो.महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याच्या विविध खात्यांचे मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्याचे करारी गृहमंत्री म्हणून त्यांचा नावलौकीक असून गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे दाखले आजही राज्याच्या राजकारणात दिले जातात.गत ३६ वर्षापासून लोकनेत्यांचा हाच राजकीय वारसा त्यांचे नातू उत्कृष्ट संसदपटू शंभूराज देसाई हे समर्थपणे चालवित आहेत.करारी गृहमंत्र्यांचा नातूही करारीच असल्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी राज्यामध्ये महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृह,वित्त व नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजगता आणि पणन या पाच खात्यांची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविली आहे. अर्थराज्यमंत्री या नात्याने राज्याची आर्थिक परिस्थिती राज्यातील साडे अकरा कोटी जनतेच्या पुढे मांडण्याची संधी अर्थमंत्री ना.शंभूराज देसाईंना मिळाली असून सातारा जिल्हयातील राज्याचे १९७५ च्या दशकातले तत्कालीन अर्थमंत्री स्व.यशवंतराव मोहिते (भाऊ) यांचेनंतर तब्बल ४५ वर्षानंतर राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडण्याचा बहूमान ना.शंभूराज देसाई यांचे रुपाने सातारा जिल्हयातील या सुपुत्रांला  मिळाला आहे.


            एक आठवडयापुर्वी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा महत्वाचा गाभा असणाऱ्या अर्थसंकल्पाला या अधिवेशनात अनन्य साधारण महत्व असते.राज्याची आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक वर्षातील राज्य शासनाचे नियोजन व करावयाची कार्यप्रणाली हे सर्व या अर्थसंकल्पावर अवलंबून असते.राज्यामध्ये नव्याने स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकारचे काम राज्यामध्ये प्रभावीपणे सुरु झाले असून महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात राज्याचे अर्थमंत्री म्हणून मंत्री ना.अजित पवार व राज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाई हे दोन मातब्बर आणि अभ्यासू नेते विधीमंडळ सभागृहाला व महाराष्ट्र राज्याला मिळाले आहेत.विधानसभेमध्ये राज्याचे अर्थमंत्री म्हणून मंत्री ना.अजित पवार तर विधानपरिषदेमध्ये अर्थराज्यमंत्री म्हणून मंत्री ना.शंभूराज देसाई हे शुक्रवार दि.०६ मार्च,२०२० रोजी सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.अर्थमंत्री म्हणून मंत्री ना.अजित पवार यांनी यापुर्वी आघाडी शासनाच्या काळात राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला आहे.परंतू नव्याने राज्यमंत्री झालेले ना.शंभूराज देसाई यांची अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.अर्थसंकल्प मांडण्याची पहिलीच वेळ असली तरी ना.शंभूराज देसाईंना महाराष्ट्र विधीमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ असा अभ्यास आहे तर महाराष्ट्र विधानसभेचे चारवेळा तालिका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सभागृहाचे कामकाज निपक्ष:पातीपणे सुरळीत पार पाडले असल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 


             पाटणसारख्या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातून आमदार म्हणून निवडून येणारे शंभूराज देसाईंना आमदारकीचा कोणताही पुर्वानुभव नसताना २००४ ला आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढल्यानंतर संसदीय कामकाजाचा त्यांनी खडान्‌खडा अभ्यास करुन पहिल्याच टर्ममध्ये आपल्या हुशारीचे कर्तृत्व सिध्द करुन दाखविले.त्यांच्या हुशारीचे मुल्यमापन महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाने करुन त्यांना पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून सन्मानित करण्यात आले. आमदार शंभूराज देसाई यांची आमदारकीची तिसरी टर्म असून विधानसभेतील कामकाजाचा व्यासंग त्यांनी इतका वाढविला आहे की विधानसभेतील त्यांच्या उत्कृष्ट ज्ञानामुळे त्यांच्यावर विधानसभेतील उत्कृष्ट जबाबदाऱ्याही मागील दोन टर्ममध्ये सोपविण्यात आल्या होत्या.विधानसभेतील शिवसेनेचा बलस्थान चेहरा म्हणूनत्यांची ओळख असून शंभूराज देसाईंनी आमदार म्हणून २००४ ते २००९ आणि २०१४ ते २०१९ चे कारकीर्दीत विधानसभेच्या एकूण ३० अधिवेशनामध्ये केलेली भाषणे पाहिली तर विधानसभेतील त्यांच्या भाषणांनी पाटण विधानसभा मतदारसंघाचा पाया भक्कम झाला असून जनतेच्या हिताच्या दृष्टीने राज्य मंत्रीमंडळातील मंत्री यांच्या काळजाला हात घालून विधानसभेत मांडलेल्या भूमिकांमुळे त्यांनी अनेक प्रलंबीत असणारी विकासकामे मार्गी लावली.शासनाकडे निर्णयाकरीता प्रलंबीत असणारे अनेक न सुटणारे प्रश्न त्यांनी त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने शासनाकडून सोडवून घेतले.


           आता राज्याचे अर्थराज्यमंत्री म्हणून विधानपरीषदेत २०२०-२१ चा मांडण्यात येणारा अर्थसंकल्प व अर्थसंकल्पावरील त्यांचे भाषण हा त्यांच्याकरीता एक आनंदाचा सोहळा असणार असून राज्यातील आणि विशेषत: सातारा जिल्हयातील जनतेकरीता तो अर्थसंकल्प अभूतपुर्व पर्वणीच असणार आहे.अभ्यासू आमदार म्हणून शंभूराज देसाई यांचा लौकिक असुन प्रभावीमंत्री म्हणून त्यामध्ये भरच पडली आहे व पडत आहे.राज्याचा राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महिन्याभरात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने कोणकोणती विकासकामे घ्यायची याकरीता ना.शंभूराज देसाई हे आठवडा आठवडाभर मुंबई येथेच तळ ठोकून होते.अर्थमंत्री ना.अजित पवार यांच्याबरोबर अर्थखात्यांच्या विविध बैठका घेवून या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील जनहितार्थ कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे याकरीता त्यांनी घेतलेली भूमिकाही खुप महत्वाची असून या बैठकांकरीता आपला बराचसा वेळ मुंबई येथे जात असला तरी मिळेल त्या वेळेत मतदारसंघात येवून मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्याकरीता त्यांचा भर दिसून आला.अर्थमंत्री म्हणून आपला पहिलाच अर्थसंकल्प राज्यामध्ये प्रभावी कसा होईल याकरीता त्यांच्या मनात थोडीफार हुरहुर असली तरी महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्हयातील जनतेला गृहराज्य व अर्थमंत्री ना.शंभूराज देसाई हे उत्कृष्ट आणि प्रभावीपणेच यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मांडतील व राज्यातील साडेअकरा कोटी जनतेपुढे सादर करतील यात तीळमात्र शंका नसून दि.०६ मार्च रोजी ना.शंभूराज देसाई मांडणार असलेल्या विधानपरिषदेतील अर्थसंकल्पासंदर्भात सातारा जिल्हयातील व पाटण मतदारसंघातील जनतेच्या मनात उत्सुकता वाढली आहे.