तळमावले
झाडांना देखील भावना, संवेदना असतात याचा शोध डाॅ.जगदीशचंद्र बोस या थोर शास्त्रज्ञाने लावला. शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे शिकले आहे. परंतू हे शिक्षण फक्त पुस्तकी असलेले आपणांस आढळून येते. प्रत्यक्ष जीवनात आपण हे आचरणात आणत नाही. परंतू झाडाच्या संवेदना जपणारीही काही माणसं आहेत. हे ऐकून आपल्याला नवल वाटेल, परंतू कराड तालुका सातारा वासिय संघटना ही साताऱ्यात आहे. कराड तालुक्यातील ही सर्व मंडळी असून ते नोकरी व कामानिमित्त सातारा या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. अशा लोकांनी कराड तालुका सातारावासिय संघटना सुरु केली आहे. ही संघटना यासाठी गेली 2 वर्षापासून झाडावरील खिळे काढण्याचेकाम करत आहे. विविध प्रकारच्या जाहिराती लावण्यासाठी, बॅनर लावण्यासाठी झाडावर राजरोसपणे सर्रास खिळे ठोकले जातात. हे खिळे काढण्याचे काम ध्येयवेडी माणसे करत आहेत.
साधारणपणे दोन वर्षापूर्वी सुरु झालेल्या या प्रवासात आतापर्यंत सातारा शहरातील सर्व झाडावरील खिळे काढण्याचे काम कराड तालुका सातारा वासिय संघटना करत आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 100 किलो पेक्षा जास्त खिळे काढले आहेत तर दीड ते दोन टक भरतील इतकी बॅनर आणि फ्रेम या संघटनेने काढले आहेत. विशेष म्हणजे हे काढणारे सर्व लोक आपला नोकरी-धंदा सांभाळून रविवारी फावल्या वेळेत हे काम करतात. रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत हे काम प्रामुख्याने केले जाते.
एखादे झाड वाढण्यासाठी बराच कालावधी जातो. सातारा शहरात 100 ते 150 वर्षे असलेली अनेक झाडे आहेत. ही झाडे खिळे ठोकल्यामुळे मरतात, त्यांना इजा होते, त्यांचे आयुष्य कमी होते असे निर्दशनास आल्यानंतर खिळेमुक्त झाड अभियान हे राबवण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे. या संघटनेत सुमारे 200 सभासद असून त्यांची मासिक बैठक प्रत्येक महिन्याला प्रत्येक सभासदाच्या घरी होते. यावेळी चहापान, अल्पोपहार होवून विविध विषयावर चर्चा केली जाते.
या अभियानाची प्रेरणा घेवून सोलापूर, सांगली, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणीदेखील खिळेमुक्त अभियान ही चळवळ सुरु झाली आहे. विविध ठिकाणच्या सामाजिक संस्था, व्यक्ती यांना या अभियानाची माहिती दिली जाते. त्यामुळे हया अभियानाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या संघटनेच्या म्हणण्यानुसार वृक्षारोपण सगळेच करतात, ती वाढवतात. परंतू उपलब्ध असलेल्या झाडांना अशाप्रकारे इजा करतात त्यामुळे या संघटनेने हे अभियान सुरु केले आहे.
सध्या त्यांचा हा उपक्रम सातारा शहरापुरता मर्यादित आहे. आतापर्यंत त्यांनी सदरबझार, राधिका रोड, मोळाचा ओढा, झेडपी रोड, एसटी स्टॅंण्ड परिसर, पोवई नाका या ठिकाणावरील सुमारे 300 झाडांवरील खिळे काढले आहेत. सध्या सातारा शहरापुरता मर्यादित असलेला उपक्रम संपूर्ण जिल्हयात राबवण्याचा निर्धार या सदस्यांनी केला आहे. या सामाजिक उपक्रमानंतर ते जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्याथ्र्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी गावोगावी जावून प्रबोधन करण्याचा उपक्रम राबवणार आहेत. यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.
झाडांना संवेदना असतात त्या जपण्यासाठी आम्ही हे अभियान सुरु केले आहे. आज आमच्या संघटनेतील प्रत्येकाला या कामात आवड निर्माण झाली आहे. प्रत्येक सभासदाच्या गाडीत खिळे काढण्याचे साहित्य असते. इतकी रुची या लोकांना वाढली आहे. इतकी जनजागृती याबाबत झाली आहे. आज साताऱ्यात आम्हाला खिळेवाले म्हणून संबोधले जाते. प्रशासनदेखील या उपक्रमात आम्हााला सहकार्य करते. असे मत या संघटनेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी व्यक्त केले आहे.
या संघटनेत नितीन पवार, महादेव डोनर, हनमंत माने, पोतेकर सर, उमेश देशमुख, संजय पाटील, गजानन कदम, संजय बा पाटील, संभाजी पाटील, भरत पाटील, अमोल कदम प्रामुख्याने काम करत आहेत. या कामामुळे एक वेगळया प्रकारचे समाधान मिळत असल्याचे मत यांनी व्यक्त केले.
वरील संघटनेचा आदर्श घेत आपणही आपल्या परिसरातील झाडांचे खिळे काढली तर हा उपक्रम राबवत असलेल्या व्यक्तिंच्या प्रयत्नांचे सार्थक होईल असे वाटते.
कलेक्टरांना ‘खिळेवाले’ म्हणून ओळख करुन दिली.
सातारचे नवोदित जिल्हाधिकरी शेखर सिंह यांच्याशी त्यांचे असिस्टंट यांनी नितीन पवार यांची ओळख करुन देताना सांगितले की, ‘हे नितीन पवार कंसात खिळेवाले’. सातारा शहरातील अनेक झाडांचे खिळे यांनी काढून खिळेमुक्त झाड अभियान ही संकल्पना राबवत आहेत.
शिवसमर्थ चा ही सहभाग:
दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रे.सोसा.लि; तळमावलेची सातारा येथे शाखा आहे. या शाखेत व्यवस्थापक या पदावर काम करणारे संजय पाटील यांचाही या उपक्रमात सक्रीय सहभाग आहे. प्रत्येक रविवारी ते त्यांच्या ग्रुप बरोबर झाडावरील खिळे काढण्याच्या मोहिमेत असतात. त्यामुळे खिळेमुक्त अभियान यामध्ये शिवसमर्थ चा ही सहभाग आहे.