फार्मसी पदवीप्राप्त स्नातकास पदवी प्रदान करताना शेतीमित्र अशोकराव थोरात, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्य एच.एन.मोरे, प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमट , प्रा.भाग्येश जानुगडे .
कराड प्रतिनिधी :
प्रत्येक व्यक्तीने कायमस्वरूपी विद्यार्थी राहिली पाहिजे. ज्ञानाचे भुकेले असले पाहिजे. ज्ञान आयुष्यभर घेत रहा ते कधीच संपत नाही. शिक्षण क्षेत्रात नवनवीन आव्हाने येत आहेत. समाजात गरीब-श्रीमंत दरी वाढत चालली आहे. ती कमी करण्याचे काम पदवीप्राप्त स्नातकांना केले पाहिजे.
असे प्रतिपादन मळाई देवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.
घोगाव ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत पदवीप्रदान समारंभ फार्मसी महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला .
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अशोकराव थोरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते त्यांच्या शुभहस्ते स्नातकांना पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी शिवाजी विद्यापीठ शैक्षणिक परिषद सदस्य व भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. एच.एन.मोरे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास मलकापूरचे नगरसेवक अजित थोरात उद्योजक भारत जंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना थोरात पुढे म्हणाले सध्या देश संकटात आहे. येथील महिलाही सुरक्षित नाहीत. समाजात चारित्र्य, नीतिमत्ता संपत चालली आहे. यासाठी येथून बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. समाजात चारित्र्य ,बंधुता ,समता, नीतिमत्ता जोपासली पाहिजे यासाठी यापुढे या विद्यार्थ्यांना लढावे लागेल.
प्राचार्य मोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले तुम्ही पदवी प्राप्त केली आहे. यापुढे तुमचे ज्ञान समाजासाठी उपयोगी पडेल याची काळजी घ्या. तरच आपण खरे ज्ञान आत्मसात केलेअसे वाटेल. आपण ज्ञानाने शहाणे होतो .पण हे शहाणपण वास्तव जीवन जगताना वापरणे महत्त्वाचे आहे. जीवनात जिद्द, चिकाटी ,संयम अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र आजच्या तरुणात ती कमी असते ही शोकांतिका आहे. नेहमी चांगल्या गोष्टीचे अनुकरण करा तरच जीवन यशस्वी होईल.
यावेळी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी आपल्या भाषणात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वास्तववादी जीवनासाठी सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास संस्थेच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य स्नातक, विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीस सचिन पाटील यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमट यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक व परीक्षा विभागप्रमुख भाग्येश जानुगडे यांनी नियोजन केले. प्रियांका थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.