स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे चित्रीकरण थांबवावे : अर्जुन खोतकर यांची मागणी


झी मराठीवरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा प्रसंग दाखवण्यात येत आहे. यामध्ये औरंगजेबाच्या तावडीत असलेल्या संभाजी महाराजांचे हाल होताना दिसत आहे. हे हाल शिवप्रेमी पाहू शकत नाहीत त्यामुळे संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे मालिकेचे भाग दाखवू नये, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे.


खोतकर म्हणाले, इतिहास लपवता येत नाही. मात्र संभाजी महाजारांचा ज्या पद्धतीने छळ करून यातना दिल्या गेल्या ते पाहणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकण्याची भीतीही आहे. त्यामुळे हे चित्रीकरण थांबवावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी  शरद पवारांच्या दबावामुळे ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका संपवण्यात येणार आहे अशी पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र याबाबत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या प्रकरणात शरद पवारांना गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे असं त्यांनी म्हटलं होतं.