"शाळा बंद आहे,पण शिक्षण सुरू आहे"


"शाळा बंद आहे,पण शिक्षण सुरू आहे"


"कोरोनाची महामारी आली नि सगळ्या जगाचे अवघे"जगच"बदलून गेले. मानव ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या सर्व क्षेत्रातील त्याच्या कार्याला थोड्या कालावधी करिता का होईना ब्रेक लागला.


    शिक्षण क्षेत्र देखील त्याला अपवाद नव्हते."ना भूतो ,न भविष्यती"अशी परिस्थिती निर्माण झाली. पण,"शिक्षण"ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने, ह्या जागतिक महामारीच्या काळोखभऱ्या काळात, शिक्षणाचा "तेजोमयी दीप"तेवत ठेवण्याचे महत्तम कार्य शिक्षक वृंद करत आहेत. ही ह्या वातावरणात सकारात्मक बाब म्हणावी लागेल.ऑफलाईन ते ऑनलाइन शिक्षण, विविध अँपचा वापर, ऑफलाईन पध्दतीने काय करता येईल?जेणेकरून विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया,अखंडपणे सुरू राहील ह्यासाठी प्रत्येक शिक्षक झटत होते अजूनही झटत आहेत.ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही ऑफलाईन(पारंपरिक)शिक्षण प्रणालीला तात्पुरता पर्याय आहे ,परंतु सद्यस्थितीत त्याचा वापर करणे आवश्यक आहे.ऑनलाईन शिक्षण पद्धती ग्रामीण भागात राबविताना खूप साऱ्या नवनवीन अनुभवांची रोजच भर पडत असते.त्यातील नकारात्मक बाबी दूर करून सकारात्मक बाबींचा विचार केला तर नवतम दृष्टी नि प्रेरक विचार मिळत जातात.


          ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविताना खूप सारी मुलं ही ग्रामीण पार्श्वभूमी असणारी,पालकवर्ग हा बहुसंख्येने कष्टकरी, श्रमिक वर्गातील असल्याने मुख्य अडचण होती,तंत्रसाधनांच्या उपलब्धतेची, त्यावरही काही सजग पालकांनी,युवा पिढीने तत्परतेने पुढे येऊन,स्मार्ट फोन उपलब्ध करून दिले,काही पालकांनी आवर्जून स्मार्टफोन विकत घेतले,त्यातील तांत्रिक बाबी समजावून घेतल्या.ह्या बाबी शिक्षण प्रणालीचे बदलते स्वरूप व सजग पालकत्वाची प्रचिती देणाऱ्या होत्या.


      काही पालकांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्यांना अशी तंत्रसाधने उपलब्ध झाली नाहीत.मग अशा मुलांचे शिक्षण थांबून चालणार नव्हते. लॉक डाऊन व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक त्यांच्यापर्यंत पोहचणे शक्य नव्हते मग अशा परिस्थितीत गट बनविणे,स्मार्ट फोन उपलब्ध असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अशा स्मार्ट फोन उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांना जायला सांगून गटात अभ्यास करणे,काही शिक्षित नवयुवक-युवती यांचे सहाय्य घेऊन अशा मुलांना "अभ्यासमित्र "बनून मार्गदर्शन करणे,घरातील आई-बाबा,इतर नातेवाईक यांच्याकरवी पाठ्यपुस्तकातील अभ्यासभाग समजावून घेणे.त्याबाबत, फोन कॉल,एस.एम.एस यांचा आधार घेऊन अशा मुलांसोबत आंतरक्रिया करणे,अभ्यासप्रक्रिया राबविणे क्रमप्राप्त होते.त्यात सर्व शिक्षकवर्गाने बहुमोल काम केले आहे.


        लॉक डाऊनची बंधने शिथिल झाल्यानंतर अनेक शिक्षकवृंद सोशल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून "शिक्षक तुमच्या भेटीला"या आगळ्या-वेगळ्या संकल्पनेला घेऊन थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन आपला विद्यार्थी अभ्यास प्रक्रियेत कुठेही कमी पडू नये यासाठी धडपडत आहेत.ह्या सर्व बाबी खरेच एक शिक्षक म्हणून मला खूपच प्रेरक व अभिमानास्पद वाटतात.


       समाजाच्या जडणघडणीत "शिक्षक"महत्वाचा घटक आहे.त्याला कोणतीही परिस्थिती, महामारी अथवा तंत्रज्ञान "कायमस्वरूपी"पर्याय ठरू शकणार नाहीच मुळी इतर बाबी ह्या केवळ त्या-त्या परिस्थितीत "सहाय्यभूत"ठरतील इतकंच...!!


 


- शुभांगी विलास पवार


जि.प.प्रा. शाळा,पाल(बेघरवस्ती)


ता.कराड,जि.सातारा