आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करू नये : ना. शंभूराज देसाई


आपत्तीच्या काळात व्यवस्थापनेकरीता शासकिय यंत्रणनेने सतर्क रहावे. - नामदार शंभूराज देसाईंच्या आढावा बैठकित अधिकाऱ्यांना सुचना.


दौलतनगर दि. 06: सातारा जिल्हयात सर्वात जास्त महाबळेश्वरबरोबर पाटण तालुक्याला प्रतिवर्षी आपत्तीचा सामना करावा लागतो.आपले तालुका प्रशासनाला तालुक्यातील आपत्ती परिस्थितीची कल्पना आहे.आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपण प्रतिवर्षी आपत्ती व्यवस्थापन व नियोजनाची बैठक घेत असतो.आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न करता आपत्ती व्यवस्थापनेकरीता सर्व शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सुचना गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.


            नामदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रतिक्षालय इमारतीत लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते. प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे,शशिकांत गायकवाड,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,सपोनि तृप्ती सोनावणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, एस.व्ही.पाटील, जि.बांधकाम विभागाचे आर.एस.भंडारे,पशुवैद्यकीय अधिकारी जाधव,महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे आदमाने, जाधव, ढेबेवाडीचे सपोनि उत्तम भजनावळे, कोयनानगरचे सपोनि एम.एस.बावीकट्टी,उंब्रजचे सपोनि अजय गोरड,गट शिक्षणाधिकारी नितीन जगताप,नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.


             याप्रसंगी नामदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात गतवर्षी मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे पुरपरिस्थती निर्माण झाली होती. तशी यावर्षी पुरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्ध्दवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी नुकतीच मंत्रालयीन स्तरावर तातडीची बैठक घेऊन राज्यातील विभागीय आयुक्तांना सुधारित उपाय-योजना करण्याकरीता शासनस्तरावर योग्य त्या सुचना दिल्या आहेत. कोयना धरणात गतवर्षीपेक्षा आजच्या दिवशी दुप्पटीपेक्षा जास्त पाणी साठा असल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने धरणपाणलोट क्षेत्रात येणारी पाण्याची आवक आणि धरणातून करण्यात येणारा विसर्ग याची सांगड घालणे गरजेचे आहे. तसेच वडनेर समितीच्या अहवालानुसार कोयना धरणाला आर.ओ.एस.मान्यता दिली असल्याने धरणाच्या दरवाजापर्यंत पाणी साठा झाल्यास धरणातून 5 टी.एम.सी.पाणी सोडण्याची मुभा आहे. परिणामी आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. दरम्यान तालुक्यातील इतर धरणांतील पाणी साठयांची माहिती घेऊन मंत्री देसाई यांनी तारळी धरणाची गतवर्षीची पुररेषेची नव्याने आखणी करण्यात यावी अशा सुचना संबंधित विभागाला दिल्या.


                    खरीपाच्या आढावावेळी प्रशासनाने चालू वर्षातील 100 टक्के पावसाचा अंदाज धरुन आपली वायरलेस यंत्रणा व सॅटेलाईट फोन यंत्रणा सुसज्ज ठेवावी. तसेच गतवर्षीच्या पुररेषेतील कुटुंबाचा मास्टर प्लॅन तयार करुन रेड लाईन व ब्ल्यू लाईनमधील कुटुंबांना सुरिक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची स्थळे सुसज्ज करा.तसेच ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी टी.सी.एल. व पावसाळयातील साथीचे आजारांवर तातडीने औषधोपचार होण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या.पावसळयात तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांमधून पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व विज वितरण कंपनीने सतर्क रहावे.तसेच विज वितरण कंपनीने अतिवृष्टीमध्ये विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी दुरुस्ती यंत्रणा विभागवार कार्यरत ठेवावी.तालुका पुरवठा विभागाकडून पावसाळयात दोन महिन्याचा धान्याचा पुरवठा वितरीत करण्यात यावा,अशा सूचना देऊन बांधकाम विभागाने तालुक्यातील पुल व रस्त्यांची कामे पुर्ण झाली असल्यास ती वाहतुकीकरीता तातडीने खुली करण्याची कार्यवाही करावी.अतिवृष्टीच्या दृष्टीने गरज असलेल्या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी.तसेच अतिवृष्टीच्या काळात वाहतूक ठप्प होणार नाही याबाबत आवश्यक त्या उपाय-योजना करण्याच्यादृष्टीने सतर्क रहावे.शिक्षण विभागाने धोकादायक शाळा इमारतीमध्ये शालेय वर्ग भरवू नयेत.शाळा माहे जुलै महिन्यात सुरु झाल्यास कोरोना रोगाचे प्रादुर्भाव रोखण्याकरीता शाळांना हॅण्ड सॅनिटायझर व मास्क याचा पुरवठा करावा.तसेच डोंगर पठारावरील जनावरांचे आठ दिवसात लसीकरण पुर्ण करावे अशा सूचना देऊन अतिवृष्टीच्या काळात तालुक्यातील सर्वच विभागातील प्रशासनाने सतर्क राहून तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना नामदार शंभूराज देसाई यांनी या बैठकीत दिल्या.