"स्मगलर" (एक वल्ली-भाग१)


"स्मगलर" (एक वल्ली-भाग१)


 


"हो ....त्याला आमच्या कॉलनीत सारेजण"स्मगलर"असेच म्हणायची....!!स्वारी कधी ,कुठून,कशी एन्ट्री घेईल,म्हणजे अवतीर्ण होईल ह्याबद्दल कोणालाच खात्रीपूर्वक सांगता येणे अशक्य होते. तो आलेला दिसला की आम्ही चिल्लर पार्टी"स्मगलर आला...!!स्मगलर आला.....!!असे म्हणून एकच गलका करून देत असू...!!


         "स्मगलर"खर पहायला गेलं तर इंग्रजी शब्द होता नि आमच्यावेळी पहिली पासून इंग्रजी नव्हते की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आम्ही शिकत नसूनही अन त्याचा अर्थ नेमका काय असेल ह्या भानगडीत न पडता सराईतपणे तो उच्चारत असू...!!ह्याचा आता फारच अचंबा वाटतो नि त्या स्मगलर शब्दाचा अर्थ कळल्यावर आपण एका वयस्कर व्यक्तीची का बरं अशी खिल्ली उडवत असू अस मनाला वाईट वाटून मी विचारात देखील पडले होते.


        तर" स्मगलर"अशीच एक भन्नाट, चमत्कारिक वल्ली मी माझ्या बालपणी पाहिलेली....!!एक साठीच्या आसपास वय असणारे म्हातारे बाबा,कमरेला मळकट पांढरे??धोतर,अंगात पूर्ण बाह्यांचा शर्ट त्याचाही अवतार तसाच,डोक्याला पटका(फेटा)सार काही मातकट रंगात रंगलेले,"दाग अच्छे हैं..!!म्हणणाऱ्या धुलाईच्या साबणाच्या जाहिरातीत दाखवतात त्याहीपेक्षा अधिक कळकट, कधीकाळी पांढरे असणारे कपडे....कुठे कुठे हातशिवण घातलेले,जीर्ण झालेले कपडे....!!घामाने,धुळीने,वयोमानानुसार रापलेला चेहरा,कधी अंघोळ करत असेल का?अशी शंका नव्हे खात्री वाटावी अस गबाळा अवतार असणारे,पायात चामडी चपला,हातापायांची वाढलेली नखे,पिवळसर दात नि एकंदरीत कुणीही....ई.....शी....म्हणावं असं बिलंदर असामी असलेला माणूस....!!पण तरीही आम्हाला तो घाण,तिरस्करणीय,तुच्छ वाटला नाही.... उलट त्याची वाट पाहणं.... तो कॉलनीत कोणाकडेही आला किंवा गेट मधून आत येताना दिसला तरी आम्ही मुलं "स्मगलर आला..!!"म्हणून हे कल्ला करून सगळ्या कॉलनीला जागे करत असू...!!त्याच्या मागेमागे जात असू...!! नि आमचे आई-बाबा.......देखील त्याला कधी हाकलून देताना, रागे भरताना आम्ही पाहिले नाहीत....!!


          "स्मगलर"...त्याचं खर नाव नव्हते, वेगळंच काहीतरी होते.(जे मला अन कॉलनीत कोणालाच ठाऊक नव्हते.)हे कॉलनीतील लोकांनी त्याला दिलेलं" टोपण नाव".....तो काही मोठा मवाली,डाकू,चोर....होता असे काही नव्हते...!हा पण चोरी मात्र करत असे...!!सराईतपणे.... सफाईदाररीतीने...!!तीही फुटकळ...कशाची???तर,भाजीपाला, कोथिंबीर, पेरू,आंबे,ऊस,ओल्या हरभऱ्याचे डहाळे, सीताफळ,बोर,चिंचा, आवळे,वांगी,हिरव्या मिरच्या ....अशा दुसऱ्यांच्या शेतातील जिन्नस.... ते देखील पाटी, पोते भरून नाही बरे....!!त्याच्या टॉवेलात किंवा शर्टाच्या पुढील भागात पोटाजवळ गाठ मारून पोटुशी बाई सारख अवतार करून,त्याच्या दंडकी(बनीयन सारखा जुन्या पध्दतीचा हाफ शर्ट जो जुने लोक शर्टच्या आतून घालत असत) त्या दंडकीच्या खिशात भरून,कधी-कधी धोतराच्या सोग्यात हे पदार्थ मावतील तेवढा डल्ला मारून विकण्यासाठी स्वारी अलगदपणे कॉलनीत प्रवेशकर्ती होत असे.कॉलनीत एकंदर सारीच कुटुंब सरकारी नोकरदारांची असल्याने इथं काहीही विकल जाणार हे "स्मगलर" चांगलाच जाणून होता. त्याच्या ह्या व्यावहारिक बुद्धीचातुर्याच व बिझनेस माईंड चे मला अजूनही फार अप्रूप वाटत बुवा...!!


            त्याच्या ह्या चोरीच्या कृत्यावरून त्याच नाव"स्मगलर"ठेवलं होतं...जसा एखादा स्मगलर मोठ्या प्रमाणावर माल, वस्तू अनैतिक मार्गाने आणतो -विकतो...तसाच हा छोटी आवृत्ती वाला स्मगलर होता.नि आमच्या कॉलनीतील हलक्या-फुलक्या वातावरणात त्याला हे"भारी...नादखुळ "स्मगलर" नावाचं बिरुद मिळालं होतं...!!त्याच्याकडील चोरीचा माल हातोहात खपवून स्वारी थेट रेल्वे स्टेशनवर जाऊन त्या पैशातून बिडी-काडी.... खायला....नि महत्वाचं... म्हणजे देशी..दारू ढोसण असली कामे पूर्ण करत असे...!!हे मोठे झाल्यावर आम्हाला कळलं!तेव्हा त्याचा मनस्वी राग आला होता.....!!त्यातही लहानपणी चोरी करू नये...खोटे बोलू नये असं शिकवणाऱ्या आई-पपा नि समस्त कॉलनीतील काका-काकू वर्गाचाही प्रचंड राग आला होता...!!का बरं हे लोक त्या चोर व्यक्तीला सहाय्य करत होते?त्याच्याकडून वस्तू विकत घेत होते?त्याच्या चौर्यकर्मात सहभागी होऊन त्याला प्रोत्साहन देत होते बर??कोणीही त्याला का दटावत नव्हते?रागे भरत नव्हते बर??पोलिसात का देत नव्हते??असे नाना तऱ्हेचे प्रश्न मला एक दिवस पडलेच...!!......(क्रमशः)


 


✒️ शुभांगी पवार (कंदी पेढा)